Friday, 16 February 2018

सुमारगड आणि सुमारगडाची मावशी....


स्वतंत्र ट्रेकर्स.


दरवर्षी प्रमाणे २६ जाने चा यावर्षीचा ट्रेक अगदी जोरातच झाला, सुमारगड़ाला अजिबात सुमार समजू नका असा सल्ला कोणीतरी आम्हाला दिलाच होता. १२ तासांच चालण काहींच्या अगदीच अंगाशी आल. २४ जाने ला रात्रि ११.०० वाजताची महामंडळाची बस होती वल्लभनगर ला १०.३० ला जमायच ठरला आणि एक जणा ( ती एक जण = सोनल ) मुळे मला निघायला निगडी मधेच १०.४५ झाले . धावत धावत रिक्शा धरली, रिक्शेवाल्याला थोड़ा गोड गोड़ बोलून त्यामार्फ़त रिक्शा बरोब्बर १०.५९ ला इच्छित स्थळी पोहोचवली. आम्ही( मी, दिनेश उर्फ़ बॉबी , सोनल ) पोहोचलो तर समोर एस टी उभीच होती पण आमच लक्ष नव्हता.
वेळेत पोचल्याचा आनंद झाला सगळे भेटले आणि कोणी म्हणाल " एकदम काट्यावर आलैस लेका !!! "
मग एस टी एकीकडे आणि आमचे सगळे लोक दूसरीकडे अस ते गणित होता तिकडे तो एस टी वाला आमची वाट पाहात होता आणि आम्ही सगळे इकडे त्याची. बॉबी कुठुनसा असा फिरून आला आणि त्याने सांगितला अरे एस टी तर तिकडे उभी आहे लगेच लोक सामान-सुमान घेऊन गाडीत जाऊन बसली. प्रसाद काका आणि मधुकाकाने आगाऊ तिकीट काढली असल्याने काही एक त्रास झाला नाही. बस तशी मोकळीच होती सुरवातीला जशी स्वारगेटला आली तशी आमची बाकी मंडळी व इतर प्रवासी आले आणि आमची बस  तुडुंब भरली. पुढचा प्रवास ४-५ तासांचा असल्याने सगळ्यांनी सॅक आणि इतर गोष्टी जागेवर लावून दिल्या. जस पुणे सोडला तस थंडी वाढत गेली आणि साधारण पहाटे ३-४ च्या दरम्यान एका चहावाल्या पाशी एस टी ने ब्रेक घेतला. कुड़कुड़त सगळ्यांनी चहा घेतला लगेच एस टी पुन्हा निघाली ती एकदम खेड़ ला येऊन थांबली. तिथेच आम्हाला ठरवलेली गाड़ी घ्यायला आली. ही गाड़ी आम्हाला श्री राजेंद्र देशपांडे यांच्या कृपेने मिळाली त्यांना धन्यवाद.सुमित, मुकुंदाकाका, जंगमभाऊं प्रसादकाका, विजयकाका, शंतनु, मधुकाका    

 ७ वाजता आम्ही जैतापुर वाडित पोहोचलो तिथे गडावर घेऊन जायला कोणी वाटाड्या मिळतोय का पाहु लागलो. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर मधुकाकांनी एक नाही तर दोन वाटाड्यांची सोय केली होती. सगळे निघाले आणि पुढे जाऊन वाटाड्यांची वाट पाहु लागलो. आश्चर्य म्हणजे आमच्या सोबत येणारे दोन वाटाड्या म्हणजे गावातल्या दोन बायका होत्या. त्या आल्या आणि आम्ही निघालो. सुरवातीला त्या ज्या वेगाने निघाल्या त्या वेगाने आम्ही निघालो खरे पण बाकी मंडळी मागे रहात होती मग तिने जी दूसरी मावशी होती तिला मागे थांबायला लावल आणि मागचे लोक तिच्या सोबत येऊ लागले. रस्ता तर इतका सुरेख होता की वाह क्या बात ! कारण आम्ही ज्या मार्गाने जात होतो तिकडून गेले वर्षभर कोणी गेले नसेल त्यामुळेच मावशी पुढे जाऊन वाट तयार करत असावी कारण थोड़े पुढे जाऊन ती जरा थांबायची मागचे लोक जमेपर्यन्त ती चहुबाजूने नजर फिरवायची आणि मग पुढे जायची .

वाट नसल्या मुळे आमची वाट लागली !!!
 काही वेळाने चालण कमी थांबण जास्त होउ लागला ती वाट अतिशय निसरडी, आजूबाजुला कमरे एवढ गवत , काट्याची झाड़े , कुठे दगड़ा खाली विंचू त्या असल्या वाटेवर कोणी जात असेल का असा वारंवार प्रश्न अशातच दुपारच ऊन चालू झालेल.मधेच एका वेलीने अशक्य हैराण केला. कोलती नावाच्या त्या राक्षस वेलीचा थोडासा स्पर्श ही पुरे मग पुढचे २-३ तास इतकी जळजळ बापरे !!! आणि इथे दोन्ही बाजूला या वेली आणि खाजारया पानाची झाड़े ती वाट म्हणजे "विना चप्पल/कपडे  विस्तवा वरुन घसरगुंडी करण्यासारख होता". सगळी कडून शरीराची नुसती आग आग होत होती. तरी मागच्या लोकांसाठी आम्ही जमेल तेवढ्या त्या वेली कापत चाललो होतो.


दोन्ही बाजूने अधेमधे वेली आणि मधून रस्ता.   
जळजळ करणारी हीच ती कोलती वेल.  

 साधारण ३-४ तासानंतर पाण्याची उणीव भासु लागली. थोड्या वेळाने सगळ्या लोकांकड़चे पाणी संपत आल होत आणि सगळया मनात एकच प्रश्न " आता  पाणी कुठे आहे ". शेवटी एका मंदिरा पर्यन्त सगळे येऊन थांबले आम्ही पोहोचेपर्यन्त मावशीने दिवा अगरबत्ती लावून घेतला आणि एक शिडी दाखवली ती चढून पुढे गेलो की लगेच पाणी अस लोकांना सांगितल्यावर थोड़ा हुरूप आला. मागचे लोक पोचले आणि १० मिनिटातच चला निघुया असा कोणी तरी म्हणाल त्या एका वाक्यावर सुमितचा सात्विक संताप व्यक्त झाला. " ए अरे काये आम्हाला बसून ५ मिनिट पण नाही झाली लगेच निघुया काय.  आधीच पाठीवर ओझे , डोक्यावर ऊन , आजूबाजूला प्यायला पाणी नाही त्यामधे तुम्ही धड़ बसूनही देत नाही."


सावली दिसली की एक पड़ी !

थोड़ा वेळ थांबलो आणि सगळे आले की मग निघालो. गडावर सॅक वैगरे घेऊन जाण्यात काही पॉइंटच नव्हता मग मावशीने एक जागा दाखवली आणि तिथे सगळ्या सॅक ठेवल्या डब्बे, जेमतेम पाणी उरलेल्या आणि  मोकळ्या पाण्याच्या बाटल्या असे सामान घेऊन वर निघालो इथे आमच्याकड़च पाणी जवळ जवळ संपल होता पण या मावशीने गेले ५ तास एक घोटही पाणी प्यायलं  नव्हत. दुपारचा १ वाजला एकदम कड़क ऊन आणि त्यात ती तापलेली लोखंडी शिडी, खाली उभा तप्त खड़क आणि वरुन जाम ऊन लागत होता. आम्ही एक दोघे पुढे आलो मावशी शिडीजवळ सगळ्यांना वर घेण्यासाठी थांबली. आता ग्रुप मधली सगळ्यात लहान ट्रेकर श्रेया खूपच दमली होती तिने तो निसारड़ा रस्ता पाहुन रडायलाच चालू केला. मी येणार नाही तुम्ही पुढे जा असे म्हणत असताना तिला मधु काका बॉबी आणि मिनल असे तिघेही हळूहळू पुढे घेऊन येत होते.उपासवाली मावशी साहिलला वर घेताना.  प्रसाद काका. 


शेवटी मावशीने त्यांना वर घेतला आणि आम्ही पुढे निघालो. काही जण शिडी च्या खालीच थांबले जिथे सॅक होत्या. काहीजण शिडी च्या वर थोड़ा पुढे सावलीत विसावले. वर जायची गडावरचीसुद्धा वाट ही निसरडीच आहे मग लोकांनी परत जायची वाट दूसरी आहे का असेहि पाहून झाले पण काही उपयोग नाही झाला जिथून आलो तिथूनच परत जावे लागणार होते यामुळे अर्ध्या लोकांची परत थोडीशी तंतरली. पाणी आणायच म्हणून मी ,बॉबी ,सोनल ,शंतनु ,साहिल ,ऋग्वेद आणि २ मावश्या असे पुढे आलो. वर पोचलो समोर पाणी दिसत होत पण समस्या अशी होती समोर साक्षात एक दणकट रेडा बसला होता त्या पाण्याची राखण करायला. मावशी इथून ओरडली

  " एय जाSSSsssय  की र बाबा पानी पिउसनी दे आमाला , जाSSSsss रे बाबू का अस करायलैस पानी पिउदै आमाला........ जा रे जाSSSsss बाबा....हर्र हुररर हैक !!!  "....... इथे तो डुरकला ना !.... कचकन उठला जागेवरून आणि आमची सगळ्यांची टरकली. सगळे २ पावल मागे हटले, तो ५ मिनिट उभा राहिला आमच्या कड़े पहात परत मावशी बोलली त्या सोबत आणि तो पुढच्या शिडीला जाऊन बसला तिकडे जायची यायची पायवाट इतकी बारीक होती की एकतर तो रेडा तरी मावला असता किंवा आम्ही तरी आणि अशातच तो रेडा जर धावत आला असता तर पाणी - बीणी विषयच संपला असता सगळा. आम्ही मस्त पाणी प्यायलो ज्या मावशीने पाणी प्यायला नव्हता तिचा पहिला मान ! आम्ही तोंड वैगरे धुतले आणि बसलो वाट पहात पण मागून कोणीच येईना मग म्हणल हे बहुतेक तिकडेच आपली पाणी घेऊन येण्याची वाट पहात बसले असावेत आमच्या सोबत २-३ डब्बे होते मग विषय झाला की आता हे डब्बे का परत घेऊन जायचे हे खाऊ पाणी पिऊ आणि मग जाऊया असे ठरले आणि आणलेले डब्बे फस्त केले , मग त्यातला एक डब्बा मस्त होता डाळ कांदा भाजी आणि पोळी वाह वाह  कोणाचा आहे हा डब्बा असे विचारले तर आमच्या पैकी कोणाचाच तो नव्हता असे कळले आता तो बंद करावा म्हणल तर करूनही काही फायदा नव्हता कारण तो संपत आला होता. डब्ब्याचा मालक कोण याची कसलीही चौकशी न करता आम्ही तो संपवला होता... सोबत आलाय म्हणजे इथल्याच कोणाचा असेल असा समज झाला, या सगळ्यामधे कळाल की ज्या मावशीने पाणीही प्यायला नव्हता तिचा उपास आहे, बापरे ! अवघड आहे हे !! मग नशिबाने सोनल का आणखी कोणी राजगिरा लाडू घेऊन आले होते. त्यातलेच २ लाडू मावशीलाही दिले. तिने काहीच खाल्ले नसते तर आम्हाला फार वाइट वाटला असत.
पुढे निघालो बालेकिल्ल्यावर जायला पण समस्या अशी होती की रेडोबा आता पुढच्या शिडी च्या खाली बसले होते. तिथे त्याच्या बाजूने जायच अस जरी म्हणलं तरी त्याची एक ढुशी आम्हाला खुप महागात पडली असती. मावशीने अतोनात प्रयन्त केले त्याला हुसकावन्याचे पण तो काही तसूभरही जागचा हलेना. उपासवाल्या  मावशीचे रेड्यासोबतचे संवाद म्हणजे अगदीच भारी होते.
" अय अार बाबा जाऊ दी की र आमाला वर का अस वाट अडवून खुळयावानी करायलैस " " उठ रे उठ बाबाsss उठ !!  जा की पल्याड कवडी जागा हाय तिकड हीकड काय गठुड बांधून बसलायैस" अस बरच काही चालू होता. शेवटी ती वैतागली आणि म्हणाली  " व्हतुस तिकड का घालु दगुड़ आता" असा म्हणून तिने दगड उचलायला वाकली आणि तेवढ्यात  दूसरी मावशी म्हणाली  "आयss  ईल की हिकड त्ये !!  जायला बी वाट न्हाय हिकड चल जाऊ म्हागारी , नाय तर तू बस मी चालले "  तो रेडा हु की चु करत नव्हता फ़क्त आमच्या कड़े खुन्शी नजरेने पाहत होता.
वाटेत थांबलेला रेडोबा 
मग आम्ही सगळे मागे निराशेने वळालो. पाण्याजवळ आलो बाटली भरलेलीच होती  आता उशीर होतोय म्हणून निघालो,पुढे गेलो तेवढ्यात हृषिकेश चा आवाज आला " अरे कुठे आहात तुम्ही, आहे का कोणी इकडे .......??"
मी आणखी थोड़ा पुढे गेलो, सगळी मंडळी पाण्याच्या शोधार्थ पुढे आली होती. त्यांना इकडे आहोत असे कळवल , त्यांनी बराच वेळ आम्हाला आवाज दिला पण आमच्या पर्यंत तो पोहोचतच नव्हता. त्यामुळे तेच लोक सगळे हळूहळू पुढे आले. थोड्याच वेळाने सगळ्यांचे डब्बे उघडले आम्ही अर्धी पोटं आधीच भरल्यामुळे जास्त काही खाल्ला नाही. आता चिंता एकच होती आम्ही डब्बा ज्या कोणाचा खाल्ला ज्या वेळी त्यांना कळेल की आपला डब्बा आधीच कोणी खाल्ला आहे तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल ? मग हळूहळू सगळे आपआपला डब्बा काढू लागले , तेवढ्यात कानावर आला " अरे ती लाल पिशवी कुठे आहे त्या मधे एक पाणी बाटली आणि एक डब्बा होता." 
तो आवाज आला रे आला की आम्ही एकमेकांकडे पहिला , झालं आता सांगायच कस ? की पंडितकाका तुमचा डब्बा आता भरलेला नाहीये ! तो केव्हाच मोकळा झालाय.थोड़ा वेळ शोधशोध झाली. मग मीच हळूच म्हणालो " अरर काका तो तुमचा होता का डब्बा ? प्रत्यक्षात आम्ही तो खाल्ला आहो, ती सोनलच म्हणाली खाऊया म्हणून चांगली झालीये भाजी, चव लागलीये आता , आम्ही म्हणत होतो की सोनल आपण नको खायला पण तीनेच संपवला अर्धा !! मग अर्धा ठेवुन काय करायच म्हणून पूर्णच संपवला." काका काही बोलायच्या आत "काका सॉरी हा !!  असा म्हणून आम्ही सोनल वर बिल फाड़ल !! काका म्हणाले "अरे हरकत नाही तुम्ही खाल्ला ना झाल तर नो टेंशन " असा म्हणल रे म्हणल एकदम डोक हलक झाल आणि बाहेर आलेले बाकीचे डब्बे खाण्यासाठी आम्ही एकंदरीत मोकळे झालो.
दूसरीवाली  मावशी
       डब्बे खाल्ले, पोटं भरली आता सगळे सुस्तावले होते. तेवढ्यात कोणी तरी म्हणाल "अरे तो रेडा उभा रहिलाय येईल आता धावत इकडे !!" आता वाद घालण्यात विषयच नव्हता पुढच्या १०व्या मिनिटाला सगळा आवरुन सगळे निघालेही. थोड्या दुरून मागे पहिला तर तो रेडा उभा राहून टक लावून आमच्याकडेच पाहात होता. त्या रेड्या मुळे दुसऱ्या शिडी जवळही जाता आल नाही मग गडावर जायचा दूरच. सगळ्यांनी रिकाम्या बाटल्या भरल्या होत्याच त्या मुळे पाणी हा विषय पुढच्या तीन-एक तासा साठी सुटला होता. दुपारचे २-२.३० वाजले होते गडाच्या खडकाळ माथ्यावर असल्याने सावलीची जास्त सोय नव्हती. आता पुन्हा तीच निसरड़ी वाट , तीच अग्निपरीक्षा द्यायची असल्याने अंगावर काटा आला, आता पुन्हा ६ तास उतरत जायच होत. श्रेया ला मधे घेतला अर्धे पुढे अर्धे मागे असे हळूहळू उतरू लागलो उतरताना तीच धसमुसत मुसुमुसु पाणी वाहातच होता. मधु काका मिनल आणि बॉबी तीघांसोबत श्रेया आपल उतरत होती. शिडिच्या खाली जी लोका थांबली होती त्यांना पाणी दिल तिकडे एक थांबा झाला. कोकणे काकांचा गुडघा दुःखत होता तर मग त्यांची मी सॅक घेतली येताना काही वेळ हृषिकेश आणि मंडळी कड़े फिरून ती उतरताना माझ्या कड़े पोस्त झाली. थोडेच पुढे मीना आत्याचीही सॅक माझ्याकडे घेतली. आता सगळ्यात पुढे आम्ही निघालो उपासवाली मावशी आणि आम्ही लोका बाकी दूसरी मावशी काही वेळ थांबली मागच्या लोकांसोबत पण काही वेळा नंतर ती वैतागली
किती हळूहळू चालत आहेत म्हणून आणि तीही एकदम पुढे निघून आली " काय बै ती म्हातारी लोका !  लै टेम घेताय ते ! म्या आलै मंग फुडा " अधे मधे जायची मागे पण पुन्हा पुढे यायची अस तीच येये जाजा चालू होता. साधारण ३-४ तासानी ६.३० - ७ वाजता वैगरे पुन्हा सगळ्यांच पाणी संपला आणि अधे मधे पाणी कुठेच नव्हता अंधार पडत होता सगळ्यांकडे टोर्च होते त्यामुळे अंधाराची भिति अशी नव्हती. आमच्या सोबत ज्या मावश्या होत्या त्या सकाळी सकाळी आमच्या सोबत निघालेल्या जर आम्ही नसतो तर त्या दुपारी १२-१ वाजेपर्यंतच गावात परत आल्या असत्या पण आम्ही ज्या गतीने चाललो होतो  त्या गतीने त्याना खूपच उशीर होत होता. जाता मावशी म्हणे  " अय बाबू तुजी पाठ दुखन कि कायला यवढी तीन-तीन वझी घेतलस रं !!!! दे माझ्याकड येक दे  ! " मी म्हणालो "थांबणारच आहे आता पुढे राहुदया मावशी चला बिगीबिगी" .... ....... आम्ही एका जागेवर येऊन थांबलो सूर्यास्त होत होता. 


मागच्या लोकांना खूपच वेळ लागत होता. अंधार पड़ला मग मंडळी येई पर्यन्त उपासवाल्या मावशी सोबत गप्पा मारत बसलो वस्तुतः ती जाम वैतागली होती घरी जेवायला कोण करेल, खुप उशीर झालाय तिचा नवरा तिला ओरडेल, वगैरे वगैरे.  मावशी म्हणजे एकदम शाकाहारी होती, कपाळावर मोठ्ठ कुंकु, केसाची एक बट पांढरी झालेली, पायात तुटलेली स्लीपर आणि तरीही सगळ्यांच्या पुढे ,दोन्ही हातात हिरव्या बांगड्या,गळ्यात तुळशी माळ आणि मंगळसूत्र, स्वच्छ नेसलेली पांढरी साड़ी आणि काहीही झाल तरी गोड़ बोलणारी, माझ नाव तिला कदाचीत माहित नसेल पण बाबू म्हणून बोलावणारी मला ती जाम आवडली होती. त्यांच्या जेवणाच्या मेनु मधला खासंमखास मेनू म्हणजे पनीर ! आणि पनीर आणण्यासाठी तिला २१ किलोमीटर दूर खेड़ला जायला लागत. खेड़ जायची सोय म्हणजे बेभरवशी एस टी महामंडळ जी मनाप्रमाणे कधीही केव्हाही कुठलीही वेळ चुकवू शकते नाहीतर आपली ११ नंबर ची बस (चालत). अश्याच काही गप्पा चालू असताना अर्धी मंडळी आली. मागे असलेल्या लोकांचा आवाजही येत नव्हता खुपच मागे राहिलेले ते. दूसरी मावशी म्हणे "चल बै ! जाऊ अपन फ़ूडा कूटट रातच्या बारीला थांबायैच यतील मागची मागून " " तुला मी सांगतय ती सगळी मांग झोपली आसतीन बग "  मग उपासवाली मावशी म्हणे "हं लै शानीयस त्यास्नि सोडून जायाच मंग हरवले बिरवले तर येशील का वापस शोधाया त्यासनी" ! " अय बाबू जा रे कुठ हायत जरा बगुन यं आवाज दे बग त्यांना " मी उठलो थोड़ा पुढे जाऊन सुम्याला आवाज दिला तिकडून ही आवाज आला पण ते लोका बरेच मागे होते. सगळ्यांच पाणी संपलेला होता त्यामुळे सगळे निवांत पडले होते. मी मावशीला म्हणालो "मावशी आपण घरी पोचलो आणि समज तुझ्या नवऱ्याने आपल्याला पनीरची भाजी आणि भाकरी केली असेल तर कसली मज्जा येईल ना ! " मावशी खो खो हसायला लागली  " हा हा हा हा ।  . . . . . . . . .  माज्या नवऱ्याने व्हय ? त्येनला सादी दाल बी करता येत न्हाई !  कसबस चा कर्तेत आन पेतात अता गेल्यासनी ईचार त्येनला !!! एवढ्या उशिरा आपल्या समदयांला घरी घेतला तरी लै जालं ! "


उपासवाली मावशी नवऱ्या सोबत !
 २०-२५ मिनिटाने वरची मंडळी पाणी कुठे, पाणी कुठे करत खाली आली. विहिर अजुन दूर आहे आणि विहिरी मधून पाणी काढायला बादली वगैरे काही नाही आहे त्यामुळे पाणी एकदम गावातच मिळणार आहे, हे ऐकून आणखी मंडळी हिरमुसली जरा वेळ सगळ्यांनी आराम केला आणि लगेच उशीर होतोय म्हणून सगळे निघाले. " आता कुनीबी माग रावु नका सगळे येकामागयक या लौकर !" आणि मावशी माझा टोर्च घेऊन पुढे निघाली तिच्या मागे मी आणि मागोमाग सगळी मंडळी पटापट निघाली.

अंधारातला रस्ता. 
रस्ता तर कळतच नव्हता घसरत  तिथुन विहिर तशी खुप दूर नव्हती पण सगळे दमले असल्याने ती खूपच दूर वाटत होती. अर्ध्या तासाने विहिर आली त्या पुढेच एक झरा लागला तिथे लोकांनी मनसोक्त पाणी प्यायल. थोड्याच वेळात पुढे गाव लागल रात्रीची वेळ असल्याने गावात नीरव शांतता पसरली होती. कोणीही मोठ्याने बोलू नका असे आपापसात खुसपुसत सगळे चालत होते. उपासवाल्या मावशीच्या घरी एकदाचे पोहोचलो गेल्या गेल्या तिने कळशीभर पाणी ठेवला सगळे परत पाणी प्यायले तृप्त झाले आणि पहुडले. काहीवेळातच तिने गरम पाणी हात पाय धुवायला आमचा अगदी राजेशाही थाट चालला होता. थोड्याच वेळात तिने जो चहा केला तो म्हणजे अगदी अप्रतिम होता. सरतेशेवटी तिने पिठला भात बनवला तोहि अतिशय भन्नाट झाला होता. सगळ्यात विशेष म्हणजे तिचा दिवसभर उपास होता, तीने आमच्या मधल्या प्रत्येकाला तीन तास विनापाण्याच उन्हात थांबून गडावरच्या त्या निसरड्या वाटेवरच्या शिडीपुढे पाण्याच्या टाक्या पाशी पोहोचवून खाली आणल होता. त्यावर हे सगळ झेलून घरी आल्यानंतर सगळ्यांसाठी चहा-स्वयंपाक बनवला होता.
           दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ४ जण पुढे निघणार होतो बाकी मंडळी उशिराच्या गाडीने परतणार होती, सकाळी चहा- नाश्ता झालाउपासवाल्या मावशीच्या घरी.
त्याआधी थोड़ा वेळ मधुकाका आणि साहिल, सुमित यांचे गायन ऐकायला मिळाले. ऋग्वेद चे पखवाजवादन झाले. मीही आपली थोडाशी बासरी वाजवली. चौकशी केल्यावर कळल दुपारी १.३० ची एस टी आहे खेड साठीची मग तो पर्यन्त पत्ते खेळलो निघताना मावशीची भेट काही झाली नाही ती सकळीच कुठे तरी बाहेर गेली होती. तिची भेट नाही म्हणून थोड़ी रुखरुख रहिलीच मनात बरोब्बर १.३० वाजता आम्ही गावातल्या एस टी स्टॅंड जवळ पोचलो. १५ मिनिट थांबल्या नंतर कळल येणारी एस टी रद्द झाली आहे. मग आता आम्ही जाण्यासाठी दूसरे वाहन शोधू लागलो. मालवाहु वाहन मिळाले पैसे ठरवले आणि आम्ही निघालो २०-२५ मिनिटाने अचानक ते वाहन थांबले चालक कोणासोबत तरी गप्पा मारायसाठी थांबला होता.एवढ्या उन्हात हा कोणाशी गप्पा मारायला थांबला असा विचार मनात, आवाज थोड़ा ओळखीचा वाटला, सर्रररर करुन एकच विचार, एकच व्यक्ति डोळ्यासमोर आली" मावशी " आणि मी मोठ्यांदा आवाज दिला " अय मावशी आर हिगड़ कुट्ट " ! !!! ती पण एकदम आश्चर्यचकित झाली "  रे बाबू निघालस कै तू पुन्याला "


बॉबी,सोनल,मावशी आणि मी. 

५ मिनट गप्पा मग  मारल्या जाता जाता म्हणे "आता माशिवरात्रि ला ये हिकड लै मज्जा अस्तेय बग त्यो
  तुजा मोबाइल नंबर टाक या मोबाईलमंदी " मी तिला माझा नंबर सेव्ह करुन दिला पण तिचा नंबर घ्यायचा राहिला काल परवा झालेल्या महाशिवरात्रीला तिची आठवण आली म्हणल गडावर नक्कीच मज्जा झाली असेल पण ती आणखी काही दुसऱ्या ट्रेकर मंडळींची. आम्ही सगळेच खुश झालो चला जाताना तरी मावशी भेटलीच . दुपारी २.३० वाजता आम्हाला पूण्याची गाड़ी मिळाली. आणि रात्री १०-११ च्या दरम्यान आम्ही पुण्यात पोहोचलो. मावशी भेटली नसती तर कदाचीत ट्रेक अधूरा वाटला असता पण ती भेटली आणि ट्रेक पूर्ण झाला.  

सहभागी सदस्य 

 1. मधुकर संत.
 2. प्रसाद ठकार.
 3. मुकुंदा संत. 
 4. दिलीप चौधरी. 
 5. हृषिकेश चौधरी.
 6. शांतनु ठकार.
 7. अनुराधा नार्वेलकर. 
 8. सुमित संत. 
 9. सोनल शर्मा. 
 10. ऋग्वेद देशमुख. 
 11. विजय कोकणे. 
 12. दिनेश अाड़कर.
 13. मनोहर पंडित. 
 14. मिनल अडरकट्टी.
 15. साहिल अडरकट्टी. 
 16. श्रेया अडरकट्टी.
 17. निखिल चौधरी.   

Tuesday, 29 November 2016

The Valley of Shadows ................Sandhan Valley ....!!!

आठवतो तो पाहिलेला चांदण्यासोबतचा चंद्र हरिश्चंद्रावर ,
कोकणकड्याच ते मनमोहक कातळ, तारामतीच पठार ,
महादेवाला प्रदक्षिणेसाठी बर्फासमान पाण्यामधे घेतलेली बुडी ती ही हरिश्चन्द्रावर। 
रतनगडाची शिडी, कलावंतीणचा आणि प्रबळगड़ावरचा म्हातारीचा किस्सा, गोरखगडावरची गुहा, वासोट्याच जंगल, पदरगडावरच चिमणी क्लाइंब, नागफणी,कोराई ,लोहगड ,विसापूर ,राजगड ,रायगड असे चिक्कार गड़ झाले,प्रत्येकाच नाव लिहित नाही पण प्रत्येकाचे सौंदर्य ते वेगळे आणि सह्याद्री मधल्या प्रत्येकाच्या आठवणी त्या वेगळ्या .
PathFinders at Pathfinders Birth Place HarishChandragad - Nikhil,Subodh,Dinesh,Varun,Abhiraj ( aani baaki mandali missing)
           गेल्या २ आठवड्यात २ ट्रेक झाले पहिला हरिशचंद्र आणि दूसरा सांधण व्हॅली दोन्ही ट्रेक ला जाम मज्जा आली हरिश्चंद्राला चौथ्या वेळेस गेलो पहिली वेळ आठवत नाही दूसरी २००७ ,तिसरी २००९ आणि चौथी २०१६, आता म्हणजे काय गडाच पार बाजारीकरण झालय. हॉटेल्स,दुकाने खुप गर्दी गर्दी झालीये, पण पहिल्यासारख राहिलय ते अमृतेश्वराच मंदिर व तिथले पाणी, वरची गुहा, महादेवाच्या पिंडी बाजुच बर्फासमान पाणी आणि कोकणकड़ा, गेल्या ब्लॉग मधे हरिश्चन्द्राच वर्णन केलेच आहे तर आता काही हरिश्चन्द्राबद्दल जास्त बोलत नाही.    

सांधण व्हॅली   !!!

         सांधण व्हॅली हा ट्रेक एक आतापर्यंतचा आलेल्या चांगल्या अणि आठवणीत राहिल अनुभवांमधे मोडतो.
सांधण व्हॅली हा ट्रेक भंडारदरयाजवळ साम्रद गावातून चालू होतो. पूर्ण ट्रेक हा ५ ते ७ तासांचा आहे. यामधे  रॅपलिंगचे ३ छोटे टप्पे, १ मोठा टप्पा आणि अधेमधे कमरेपेक्षा वर असलेल्या पाण्यामधून ओलांडून जावे लागते. या ट्रेक नंतर तुमच्या कड़े खुप जणांना सांगता येईल असे भारी किस्से/अनुभव असतात. आयुष्यात एकदा तरी सांधण व्हॅली ला जाउन या असा मी म्हणेन.
        पहिल्यांदाच अश्या १९ जणाच्या ग्रुप सोबत ट्रेकींगला गेलो. पहिल्यांदा मी जास्त लोका आहेत म्हणून नाही असेच म्हणालो होतो पण नंतर विचार बदलला ( किंवा तो बदलायला भाग पाडला ) . आपल्या ग्रुप मधे एकदम छान राहाता येत दूसरी कड़े असे वागता येत नाही दूसरे लोक चांगले असतीलच असे नाही, असे काही समज -गैरसमज दूर झाले, एकंदरीत सगळे ट्रेकर हे सारखेच असतात खिलाडू वृत्तीचे ( म्हणजे सगळेच असे नाही पण इथे मला जे भेटले ते तरी होते :P ).
      शुक्रवारी मुंबई ची गाड़ी पकडली तिथुन घाटकोपरला गेलो . तिथे आदित्य अणि मंदार अश्या राधेयच्या मित्रांनी आमच ( मी आणि सुरभि ) स्वागत केला सोबत जेवलो थोडावेळ इकडे तिकडे टाइमपास केला आणि रात्रि १२.५० ला कसारा ला जाणारी ट्रेन पकडायची आहे असे लक्षात ठेवून बरोबर रात्रि १२.४५ ला घाटकोपर ला पोहोचलो . पुढे १० मिनिटातच ट्रेन आली आणि आम्ही बसलो गाडीत जागा आहे असे पाहून फार आनंद झाला कारण मुंबई मधे ट्रेन/लोकल मधे बसायला अथवा झोपायला जागा मिळणे म्हणजे अंधारात सुई शोधण्यासारखेच आहे एवढी ती गर्दी असते तिकडे , डोंबिवली मधून काही , ठाणे मधून राधे आणि काही अर्धे लोक असे सगळे एकत्र जमणार होते . आम्ही बसल्या बसल्या ग्रुपवर मेसेज टाकून दिला "सगळ्यांनी पाचवा डब्बा पकड़ा !!" विशेष म्हणजे सगळे एकत्र एका डब्यात जमले . पहिल्यांदा कोणाची ओळख नसल्याने आम्ही आपआपल्या मधेच गप्पा मारत बसलो होतो . मुंबई मधे बसलो तेव्हा काहीच थंडी वाजली नाही , हाफ पँट आणि हाफ शर्ट घालून बसलो होतो पण जस जस कसारयाच्या दिशेने गेलो तशी तशी थंडी वाजु लागली एक वेळ अशी आली आहे त्या कपड्यावरूनच फुल पँट आणि स्वेट शर्ट वर आणि मफलर चढवला,

Punyatali Madnali, Aditya,Sudhir,Pradip ,Sneha, Surbhi, Radhey.
मग कसारयाला साधारण पहाटे ३.३० ते ४.०० च्या दरम्यान पोहोचलो,प्रचंड थंडी होती तिथेच आमचे लीड स्वनिल ने जीप ची सोय केलेली होती. १९ जणांसाठी दोन जीप ठरलेल्या होत्या मग आमच्या जीप मधे मागे मी , राधेय , आदित्य ,सुरभि आणि मधे स्नेहा , निकिता , स्रीपर्णा , विरजा आणि सगळ्यात पुढे नादखुळे ट्रेक रेंजर्स चे मालक :D स्वप्निल आणि अमिषा , बाकी सगळे उरलेले लोक दुसऱ्या गाडीत , थोडेसे पुढे  गेल्यावर परत थांबलो ,चहा,कॉफ़ी झाली आणि मग साम्रद गावात जायला गणपती बाप्पा मोरया करून निघालो. रस्त्यात जीपच्या मागे राधेय कड़े स्पीकर होता त्यावर मस्त जूनी ऐकली तीच आम्ही इतक्या मोठ्याने म्हणत कदाचित पुढच्या कोणाला झोपच लागली नसेल शेवटच " घेई छंद मकरंद " गाण्याने तर पार गावातल्या लोकांची पण झोप उडाली असेल. पहाटे ५ ते ५-३० च्या दरम्यान साम्रद या गावात पोहोचलो येथूनच हा ट्रेक चालू होणार होता , उतरल्यावर समोर कळसूबाई ,रतनगड़ ,आजोबागड़ , अलंग मदन कुलंग, असे काही छान गड़ दिसत होते . मग काही लोक सूर्योदय पहात बाहेर तर काही जण तिथेच एका घरी गेल्या गेल्या काही लोक उताणे पडले , सूर्योदय झाल्यानंतर समोरच्या सह्याद्रीच्या रांगेवर पडलेला सूर्यप्रकाश अप्रतिम दिसत होता,नंतर प्रकाश नावाच्या गावकऱ्या कड़े नाश्ता करायचा आहे असे कळले आणि त्यानंतर ८ - ९ च्या दरम्यान निघणे अपेक्षित होते , नाश्त्याला जेव्हा पोहोचलो समोर पाहतो तर काय एक ४० आणि ३० लोकांचा ग्रुप आधीच तिकडे आलेला आहे , तेव्हा मला तर जत्रेचा अनुभव आला, काही वेळाने त्यांचे ते पुढे गेले आणि मग थोड़े बरे वाटले. तो पर्यन्त प्रातःविधि आटोपून सगळे आपले नाश्त्याला तयार !!!  मग नाश्ता झाला आवरून झाल आणि सगळे निघायच्या बेतात येऊन बाहेर थांबले आमचे लीड असलेले स्वप्निल यांनी सगळ्यांचे परिचय करून घेतला सगळ्यांची नावे कळाली, त्यातले एकच नाव मला खुपच वेगळा वाटल ते होता शूर्पकर्णखा उर्फ कोलकाता . बऱ्याच वेळाने नंतर मला कळाल की ते शूर्पकर्णखा नसून स्रीपर्णा आहे , पण तोपर्यंत उशिर झाला होता कारण आता डोक्यात फिट झाल होता - शूर्पकर्णखा फ्रॉम कोलकाता !!!

Nadkhule Trek Rangers Mandali.(me nahiye photot :( )
           Trekkers sathichi Swagat Kaman !!!


तेव्हाच आमच्या लीड ने सांगितले वाटेत जाताना कमरेच्या थोड़ा वर पर्यन्त पाणी आहे तर बूट ओले करायचे नसतील तर पायात चप्पल घालून घ्या . सगळ्यांनी आपापल्या सोयीनुसार पायताण चढ़वल आणि निघाले . थोडेच पुढे चालून गेल्यावर दोन झाडांची कमान दिसली , तिथेच आमचा खरा ट्रेक चालू झाला.
थोडेच पुढे गेल्यावर थोड़ा कोरडा पडलेला ओढा लागला , मस्त दोन्ही बाजूला सावली थोडस जंगला सारख आम्ही मोठ्या घळी मधून चालत होतो. मोठ मोठाले दगड दरड़ कोसळल्या सारखे वाटेत आडवे-तिड़वे पडले होते. त्यांना चुकवत आम्ही आपला पुढे सरकत होतो.थोड्यावेळाने दिसले ते पाणी जे ओलांडून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. तारेवरची कसरत करत आमच्या लीड ने पाण्यात पाय न भिजवता पलीकडे कसे जावे याचे प्रात्याक्षित दिले, त्याला अनुसरुन काही जण मागुन गेले.
Radhey, Surabhi mage Avinash, Lalit
माझ्यासकट काही लोकांना एकदम पाण्यातली वाटच सोयीस्कर वाटली आणि आम्ही पाण्यातून गेलो , जाताजाता पाय घसरला पण पाण्यात पडलो नाही . पाण्याचा पहिला टप्पा जामच भारी वाटला. थोडेच पुढे गेल्यानंतर पाणी कमरेपेक्षा वर असलेला टप्पा दिसला तिथे जरा काही लोकांची तारांबळ उडाली, कारण पाणी ओलांडायच होता आणि सॅक पण भिजवायची नव्हती आणि पाणी अगदी थंड होता .
Kamrevar Panyacha pahila tappa sagale
saman suman pack kartana.
सगळ्यांनी आपआपले सामान सॅक मधे भरल एकामागोमाग एक उतरले सॅक डोक्यावर घेऊन स्वप्निल , मी , अमीषा , राधे , आदित्य ,सुरभि असे सगळे निघालो. अधिच ठरला होता की सरळ रेषेत उभे राहून सॅक पास करायच्या, माझी सॅक जड़ असल्याने कोणाला द्यायच्या भानगडित पडलो नाही पण एका टोका पासून दुसऱ्या टोकाकडे डोक्यावरून सॅक घेऊन जाताना माझी बऱ्यापैकी दमछाक झाली होती. मग अर्ध्या पर्यन्त परत मागे येऊन बाकीच्या लोकांच्या सॅक आम्ही दुसऱ्या जागेवर पोस्त केल्या. आता आमची स्थिति अर्धवट भिजलेली होती , खरी मजा शेवटी होती जेव्हा मी शेवटची सॅक दिली त्यानंतर परत लोकांना तिथेच थांबायला सांगितले मधोमध गेल्या गेल्या कोणी कस अर्ध भिजलेल कस असू शकत असे म्हणून बऱ्यापैकी लोकांना भिजवल . झाल ज्यांना मी भिजवलेल त्यांनी एकत्रित येऊन मला भिजवुन बदला घेतला , आता मात्र सगळेच पेटले मग सगळेच एकमेकांना भिजवत यथेच्छ भिजलो. १०.३० पर्यन्त सगळे याबाजूला आले,
Panyatali Masti.
बाहेर आल्यानंतर बऱ्यापैकी थंडी वाजत होती. पुढे गेल्यानंतर ऊन लागल, इथे रस्त्यामधे उतरताना शूर्पकर्णखा उर्फ कोलकाता १-२ वेळा पडली , तीच पड़ण म्हणजे घसरून धप्प करून खाली बुडावर बसणे , येताना मी बऱ्यापैकी गुर-ढोर जशी हकताना ओरडतात तसा मी ओरडत होतो. अधेमधे आणखी एक दोघानी पण साष्टांग नमस्कार घातला पण कोलकाता एवढा बोलबाला कोणाचा झाला नाही ,कारण नंतर नंतर कोण पड़ल याच एकमेव उत्तर हे कोलकाता असायच.स्नेहा ने पण एवढे सगळे पड़त आहेत मग मीच का पडू नये असे म्हणून पडून घेतले.  या व्हॅली मधे छान इको येत होता थोड़ा पुढे गेलो आणि काढली बासरी , बसलो वाजवत.  बरोब्बर १ वाजता आम्हाला पहिला रॅपलिंग चा टप्पा लागला. आम्ही वाटेत एका आडोश्याला थांबलो मागच्या लोकांची वाट पाहत थोड्यावेळाने वरच्या लोकांपैकी कोणाचा तरी मोठ्याने हसायचा आवाज आला तो बहुतेक अजिंक्य असावा , मग इथून कोणीतरी म्हणाल हा हसतोय म्हणजे नक्कीच कोणीतरी पड़ल . काहीवेळाने मागची लोका आली आणि आम्ही निघालो रॅपलिंग करायला , पहिला कातळ टप्पा बहुतेक ५०-६० फुटांचा असावा स्वप्निल ,अमीषा ,आदित्य ,राधे ,सुरभि,सुधीर,स्नेहा,प्रदीप असे सगळे एकामागोमाग एक पुढे जाऊ लागलो तोपर्यंत मागची मंडळी आराम करतच होती ,

Pradip,Sneha,Sudhir.

Lalit,sandeep,viraja,swapnil,avinash,nikita

Swapnil,Swapnil,Radhey,Sandeep,Aditya,Pradip,Surabhi. 
 तिथल्या इंस्ट्रक्टरने हार्नेस आम्हाला लावला आणि पुढे जायला सांगितला , जेव्हा ती दोरी धरली पहिल खात्री करून घेतला वरुन सुटणार तर नाही ना मग हळू हळू एका हाताने दोरी सोडत सोडत नंतर खाली किती खोल राहिल आहे ते परत पहायची हिम्मत झाली नाही, वरचा तो इंस्ट्रक्टर काहीतरी म्हणत होता, त्याकडे लक्षही नव्हत केव्हा एकदा खाली जातोय असा झालेल सरतेशेवटी उजव्या हातावर जाम लोड आला होता पण उतरलो मज्जा आली . बाकी लोक पण एकेक करून उतरले


Amche lead Nadkhule Trekkers che Malak- Swapnil


Me Utartana :) !!

आता जेवायच काय हा एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात होता सगळ्यांना सडकून भूख लागलेली. आता इथे किस्सा असा झाला आमच्या साठी प्रकाशकडून जे जेवण मागवल होता ते दुसऱ्या ग्रुप च्या लोकांनी आम्ही पोहोचायच्या अधिच खाऊन टाकला हे आम्हाला जेव्हा कळला तेव्हा दुपारचे २.४५ झाले होते . तिथेच जेवण मिळणार नाही हे ऐकल्यावर कोलकाता एकदम ढासळलीच " हमें खाना नहीं मिलेगा? " " अभी और कितने दूर जाना है? " " रैपलिंग और भी है क्या? "
असे असंख्य प्रश्न तिच्या समोर दत्त म्हणून उभे राहिले आणि तिच्यामुळे आमच्यासमोरही !!!
जेवण नाही  म्हणून लोकांनी आपला चकली चिवड़ा असे चिरमिर खाऊ बाहेर काढले त्यावरच आम्ही समाधान मानून पुढे निघालो. तिला बाकी लोकानी विचारालाही हे खायच का? नाही म्हणाली , मग निघालो आम्ही.
कोलकाता शूर्पकर्णखा उर्फ़ स्रीपर्णा :P मागे सुधीर,स्नेहा,अमीषा,स्वप्निल,आणि मी. 
 छोटा रॅपलिंगचा टप्पा पुढे ती जामच वैतागली होती , शूज ओले होउ नये म्हणून पाणी आल की शूज काढ़ा थोड़े पुढे कोरडे आहे असे जाणवले की परत शूज घाला , थोड़े पुढे जातोय न जातोय तोवर पुन्हा पाणी  !!!! आता बऱ्याच लोकांच्या पायात वात भरत होता इकडे तिकडे   ....... आ..ऊ...... . ! चालूच होता खाऊन झाल आणि पुढे निघालो . दूसरा कातळ टप्पा ज्याच्या दुसऱ्या बाजूला एकदम पाणी  ज्याला पाण्यातून जाण्याशिवाय मार्गच नाही परत सॅक काढायचे सोपस्कार झाले आणि एकेक उतरून खाली आलो , पुढे गेलो तिथे एका फटीमधून आम्हाला जायचा होता. अगदी इवलीशी होती ती फट आणि तिथुन जाताना पाय खाली डोका वर असे उलटे जायचे होते पूर्ण गडद अंधार काही दिसेना.
एवढीशी फट - पुढची बाजू.  
तीच फट दुसऱ्या बाजूने.  
   दुसऱ्या बाजूंच्या फटीतून सगळ्यांच्या सॅक पुढे दिल्या आणि एकेक करून आम्ही उलटे होऊन खाली . इथे पुन्हा छोटा टप्पा होता रॅपलिंगचा !! लोकाना इथे येईस्तोवर रॅपलिंग ची सवयच झालेली होती इतक्या वेळ नाही नाही करणारे काही लोक आनंदात पुढे जात होते. सगळे खाली आले जरा वेळ बसलो परत कोलकाताचा प्रश्न " अभी और कितने दूर जाना है? रैपलिंग ख़तम ना ? " तिला रॅपलिंग सगळ संपला आहे आणि आता आपण पोहोचणारच आहोत असे सांगून निघालो,

मी,विराजा,सुरभि,राधेय,आदित्य स्वप्निल,अमीषा थोडेच पुढे गेलो आणि विरजा म्हणाली। ...    सरप्राइझ !!! समोर पाहतोय ते काय पुन्हा एकदा रॅपलिंग तेव्हा एवढेच शब्द बाहेर आले " अरे याररर र र !!! "
तो खरच शेवटचा आहे असे सांगून उतरलो , इथे मुलींसाठी वेगळा रोप आणि मुलांसाठी वेगळा रोप असा भेदभाव केला होता.  मुलांचा जो रोप होता तो पाण्यातुन जाणारा होता ( वॉटरफॉल रॅपलिंग  ) आणि त्याला काही हार्नेस वैगेरे प्रकार नाही कमरेला दोरी बांधणार आणि सुटायचा खाली पाण्यातून , मुलींची सोय चांगली होती मस्त ग्लोव्ज , आणि हेल्मेट हार्नेस वगैरे, वगैरे पण त्यांच्या वाट्याला पाणी नव्हत कोरड्या जागेतून त्यांना रॅपलिंग करायची मुभा , मग सगळ्या पोरी गेल्यानंतर २-३ हार्नेस बाकी होते त्या इंस्ट्रक्टरने विचारले कोणाला जायचे आहे का इथून आम्ही लगेच एका पायावर तयार ,मी आदित्य आणि अजुन एक दोघे तिकडून गेलो आणि बाकी मंडळी भिजत भिजत उतरले. या सगळ्या गडबडीत राधे ची बॅग पाण्यात पडली , ३-४ मिनट पाण्यातच आणि नशीब राधे थोड़ा बाजूला उभा होता नाहीतर काही खर नव्हत .पटकन त्याने ती बाहेर काढली आणि मोकळी केली आत मधे सगळ प्लास्टिक बॅग मधे गुंडाळून ठेवला होता त्यामुळे त्याची रात्री झोपायची पंचाईत झाली नाही.संध्याकाळी बरोबर ६.०० वाजता शेवटचा कातळ टप्पा उतरून आम्ही पुढे निघालो.

रॅपलिंग चा शेवटचा टप्पा उजव्या बाजूला पाण्यामधून डाव्या बाजूने कोरडया जागेतून !!!
 तिथुन तंबू पर्यन्तच अंतर जास्त नव्हत. अंधार पडत चालला होता मग आम्ही टॉर्च बाहेर काढल्या इथून तंबू पर्यन्त जाईपर्यंत कोलकाता उर्फ शूर्पकर्णखा चा घसरणे वजा पड़ने असा २-३ वेळा कार्यक्रम झाला. तंबू ठोकलेल्या जागेवर पुढच्या अर्ध्या - पाउण तासात पोहोचलो ,सगळे निवांत पहुडले होते समोरच गावतले जे आम्हाला जेवण करून देणार होते त्यांची तयारी चालू होती. ओढयाच्या बाजूलाच तंबू ठोकलेले होते.


गेल्या गेल्या पाहिला आयता चहा मिळाला दोन कप चहा मारुन आम्हीपण लोकांमधे पहुडलो , वर छान चांदण दिसत होता. असा पहिल्यांदाच झाल की ट्रेक आयता चहा मिळाला नाहीतर दरवेळेला आम्ही पोहोचलो की मग सगळे ते सोपस्कार चूल पेटवणे आणि मग दूध बनवा वगैरे वगैरे पण इथे स्वप्निल ने बऱ्यापैकी सोय करून ठेवली होती. अर्धे लोक तंबू मधे गेले अर्धे तिथेच पडून राहिले , रात्रि ८-९ दरम्यान सगळे जेवायला पुन्हा एकत्र आले , जेवण म्हणजे अगदी कोणालाही किंचितहि थंडी वाजु नये असेच बनवले होते अगदी झणझणीत , मस्त मसाले भात, आमटीवजा भाजी, पूरी, लोणच (आता या मधला नेमका तिखट काय होता हे नाही कळाल कारण सगळ तिखटच लागत होता ). काही लोकांना तिखट नाही लागला बहुदा सवय असावी पण ज्याना तिखट लागल त्यांनी साखर स्पेशल स्वीट डिश म्हणून मागवली.रात्रि कॅम्प फायर झाली गप्पा गोष्टी झाल्या.रात्रि परत कुठेतरी चालताना कोलकाता पडल्याचे ऐकले पण विशेष नाही.

                                                                   PC - Lalit
 दुसऱ्या दिवशी आमचे लीड स्वप्निल सादये याचा वाढदिवस होता. रात्रि केक आणि बाकी सजावट ही त्यांच्या टेंट मधे करून ठेवली ( स्वप्निल च्या नकळत ), मग रात्रि ११.३० चा गजर लाउन आम्ही झोपलो, दमलो असल्याने झोपही लगेच आली. रात्रि ठरल्याप्रमाणे गजर वाजला लोका उठले वाढदिवस साजरा झाला, आणि पुन्हा सगळे झोपुन गेले.

अवधूत,अविनाश,आदित्य,राधेय,अजिंक्य,स्वप्निल,स्वप्निल,ललित,सुरभि,अमीषा,विरजा,निकिता,प्रदीप,स्नेहा रूपेश,सुधीर 
सकाळी ७-८ दरम्यान जाग आली बऱ्यापैकी सगळी मंडळी आपापल्या तम्बू मधून बाहेर डोकावत होती. सगळ्यांची झोप सुखाची झाली असावी फ़क्त लोकांचे हातपाय बऱ्यापैकी ओरडत होते. मी जेव्हा उठालो माझा आवाजच फुटेना काल उगाच लोकांना चिडवल तेही ओरडून ओरडून लोकांनी मनापासून शिव्या दिल्या की माझा आवाजच बसला ( जस्ट किडिंग नथिंग सिरियस ) !!  सकाळी ९ वाजता मस्त पोह्यांच्या नाश्ता झाला चहा झाला,
नाश्ता पोहे !!!

 सगळ्यांनी सॅक आवरायला चालू केला. ज्यांच आवरून झालेल त्यांनी सगळ्यांचे  फोटो काढून घेतले सरतेशेवटी एक झक्कास ग्रुप फोटो झाला.

तिथुन आम्ही निघालो. सगळ आवरून निघेपर्यंत १०.४५ झाले, जामच ऊन पड़ल होता. तासभर चालल्या नंतर आम्ही सावलीच एकेठिकाणी थांबलो. इथे विविध गुणप्रदर्शन आणि आभारप्रदर्शन झाल , आभारप्रदर्शनात राधेय ने बनवलेले एक फूलवजा पुष्पगुच्छ स्वप्निलला सर्वांतर्फे दिला , विविध गुणप्रदर्शनात त्यामधे आमिषाने बऱ्याच पक्षांचे आवाज, काही मिमिक्री करून दाखवल्या त्यातली कोकिळातर अगदी हुबेहुब होती . प्रदीप ने राजकुमार ची मिमिक्री केलि आणि सरतेशेवटी लाजाळू बाबु उर्फ अवधूत ने खुप विनवण्या केल्यानंतर " लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" हे गाणे गाउन दाखवले,

पुष्प नसलेला गुच्छ प्रदान सोहळा !!!!
सगळ झाल्यावर निघालो भरपूर ऊन खात जेवण करायच्या जागेचा पत्ता शोधत आम्ही आपला चालत होतो मधे एक वेळ अशी आली की रस्ता चुकलो की काय असे वाटले, पुढची मंडळी खुपच पुढे आणि मागची मंडळी खुपच मागे असा काहीसा प्रकार झाला होता. राधेय , आदित्य आवाज देत होते,उतरताना माझा आवाजाचा ओरडून जवळ जवळ गेलाच होता त्यामुळे मी काही ओरडायचा प्रयत्न केला नाही , आम्हाला २ सेकंद साठी वाटलासुद्धा हरवलो म्हणून पण जरा थांबलो मागचे लोक येई पर्यन्त. ( मनात असा की मागचे सोबत जर आले तर हरवलेल्या लोकांची संख्या वाढेल आणि जास्त टेंशन येणार नाही ) मग जरा वेळ मागचे येई पर्यन्त थांबलो २० मिनिटने मागची मंडळी दिसली आणि आम्ही तसेच पुढे निघालो. वाटेत एका जवळ जवळ कोरडा झालेल्या ओढ्या जवळ थांबलो सगळ्यांना तहान लागलेली होती सगळ्यांच्या जवळचे पाणी संपल्यात जमा होते.
दुपारच्या एका निवांत क्षणी सावलीत.... 

स्वप्निल सांगत होता की पुढे तुम्हाला पाणी मिळेल थोडेच पुढे तिथे बोरवेल आहे... पोर आपली पुढे बोरवेल च्या आशेने चालत होती पण तो बोरवेल काही दिसत नव्हता. दुपारचे २ वाजले तरी बोरवेल चा पत्ता नाही , बहुदा रस्ता चुकला असावा.
दुपारचे कोवळे कड़क ऊन खात जाताना  !

थोड्याच वेळात ते गाव लागल बोरवेलही लागल पण जे बोरवेल हवा होता ते नाहीं लागल कारण आमच जेवणाची सोय ही एका बोरवेल समोरच्या घरात झालेली होती आणि तो बोरवेल आम्हाला किंवा स्वप्निलला मिळत नव्हता. पण जिथे आलो त्या घरात छान थंड पाणी प्यायलो आणि २ मिनटे सावलीत बसून तिथल्या आज्जीना चॉकलेट्स आणि बिस्किटे दिली धन्यवाद म्हणालो आणि निघालो तिथेच कळाल आम्ही जे घर शोधतोय ते थोडेच पुढे आहे. देहणे गावातल्या त्या पाट्करांच्या घरात एकदाचे पोहोचलो आणि जे सॅक बाजूला टाकून पडलो ते जेवण तयार होई पर्यन्त हललोच नाही. फोटो पण काढायला कोणी उठत नव्हत मग विरजा ने कोलकाता उर्फ शूर्पकर्णखा ला बाजूला बसायला ये असा आवाज दिला आणि ती येताच तिच्या हातात कॅमेरा देत फोटो काढायला सांगितल, ती जवळ जवळ वैतागलीच पण तरीही तिने काढले ३-४ चांगले फोटो. जेवण तयार होई पर्यन्त अर्धे लोक गप्पा मारत होते आणि उरलेले अर्धमेल्या सारखे पडलो होतो. जेवण तयार आहे असा कळलं आणि आम्ही थेट घरात......
दुपारच्या उन्हात दमलेली, तहानलेली ,भुकेलेली मुले.  
 जामच भूक लागलेली होती. ४ जण शाकाहारी आणि बाकी चिकन हाणणारे छान बसलो आणि समोर जेवणाच ताट वाढायला सुरुवात झाली. वाळवलेल्या कैरीची आमटी , भाजी ,भाकरी ,लोणच,पापड़ ,भात , वरण असा सागरसंगीत जेवण आमच्या नशिबी होता. आख्या ट्रेक मधले ते शेवटच जेवण म्हणजे एखाद्या आईसस्क्रीमच्या शेवटच्या घासाला छानशी चेरी येणे असा इतका छान होता.

मस्त जेवण !!!
 जेवण झाल आणि जीप ची वाट पहात पुन्हा आम्ही वरांड्यात पहुडलो. काही जण गावातल्या ३ लहान मुलांसोबत नावाच्या भेंड्या खेळत बसले , ती लहान पोर पण जाम हुशार होती. त्यांच्या मधे २ पोर आणि १ पोरगी होती, त्यांनी जवळ जवळ गावातल्या सगळ्या लोकांची,मित्रांची,हीरो,हिरोइन यांची नावे सांगितली. पार WWE मधल्या JOHN CENA पर्यन्त नावाच्या भेंड्या जाऊन आल्या. काही वेळाने ठरवलेल्या २ जीप आल्या परत सॅक वगैरे गाडीत टाकल्या. गाडीत परत मोठ्या आवाजात गाणी पण माझ्या घश्याची बोम्ब झाल्याने अजूनही माझा आवाज काही फूटत नव्हता. तिथुन जीप ने आम्हाला आसनगाव स्थानका पर्यन्त सोडले आणि तिथुन आम्ही निघालो ते ठाण्यात उतरून आम्हाला कुठलीशी ती ७. १० ची हुबळी एक्सप्रेस मिळाली, तिथुन एकदम पुणे रात्रि बरोबर ११:३० वाजता मी घरी पोहोचलो.
           एकंदरीत खुप मज्जा आली या ट्रेक ला बरेच लोक नविन होते, चांगल म्हणजे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही सगळे जसे धडधाकट आले होते तसेच परत गेले. खरचटणे, दुखणे वगैरे छोट्या मोठ्या गोष्टि अश्या होतच असतात, बऱ्याच नविन छान ओळखी झाल्या, तुम्हा सगळ्यांना खुप खुप धन्यवाद !!!!

लोकल च्या अर्ध्या डब्ब्यावर आमचा कब्ज़ा !!!सदस्य -
१. सुरभि
२. अमीषा
३. स्रीपर्णा ( कोलकाता शूर्पकर्णखा :P )
४. स्वप्निल ( आमचा लीड )
५. राधेय
६. आदित्य
७. विरजा
८. ललित
९. निकिता
१०.सुधीर
११. संदीप
१२. अजिंक्य
१३. अवधूत
१४. प्रदीप
१५. स्नेहा
१६. स्वप्निल
१७. अविनाश
१८. रूपेश
१९. निखिल