Friday 16 February 2018

सुमारगड आणि सुमारगडाची मावशी....


स्वतंत्र ट्रेकर्स.


दरवर्षी प्रमाणे २६ जाने चा यावर्षीचा ट्रेक अगदी जोरातच झाला, सुमारगड़ाला अजिबात सुमार समजू नका असा सल्ला कोणीतरी आम्हाला दिलाच होता. १२ तासांच चालण काहींच्या अगदीच अंगाशी आल. २४ जाने ला रात्रि ११.०० वाजताची महामंडळाची बस होती वल्लभनगर ला १०.३० ला जमायच ठरला आणि एक जणा ( ती एक जण = सोनल ) मुळे मला निघायला निगडी मधेच १०.४५ झाले . धावत धावत रिक्शा धरली, रिक्शेवाल्याला थोड़ा गोड गोड़ बोलून त्यामार्फ़त रिक्शा बरोब्बर १०.५९ ला इच्छित स्थळी पोहोचवली. आम्ही( मी, दिनेश उर्फ़ बॉबी , सोनल ) पोहोचलो तर समोर एस टी उभीच होती पण आमच लक्ष नव्हता.
वेळेत पोचल्याचा आनंद झाला सगळे भेटले आणि कोणी म्हणाल " एकदम काट्यावर आलैस लेका !!! "
मग एस टी एकीकडे आणि आमचे सगळे लोक दूसरीकडे अस ते गणित होता तिकडे तो एस टी वाला आमची वाट पाहात होता आणि आम्ही सगळे इकडे त्याची. बॉबी कुठुनसा असा फिरून आला आणि त्याने सांगितला अरे एस टी तर तिकडे उभी आहे लगेच लोक सामान-सुमान घेऊन गाडीत जाऊन बसली. प्रसाद काका आणि मधुकाकाने आगाऊ तिकीट काढली असल्याने काही एक त्रास झाला नाही. बस तशी मोकळीच होती सुरवातीला जशी स्वारगेटला आली तशी आमची बाकी मंडळी व इतर प्रवासी आले आणि आमची बस  तुडुंब भरली. पुढचा प्रवास ४-५ तासांचा असल्याने सगळ्यांनी सॅक आणि इतर गोष्टी जागेवर लावून दिल्या. जस पुणे सोडला तस थंडी वाढत गेली आणि साधारण पहाटे ३-४ च्या दरम्यान एका चहावाल्या पाशी एस टी ने ब्रेक घेतला. कुड़कुड़त सगळ्यांनी चहा घेतला लगेच एस टी पुन्हा निघाली ती एकदम खेड़ ला येऊन थांबली. तिथेच आम्हाला ठरवलेली गाड़ी घ्यायला आली. ही गाड़ी आम्हाला श्री राजेंद्र देशपांडे यांच्या कृपेने मिळाली त्यांना धन्यवाद.



सुमित, मुकुंदाकाका, जंगमभाऊं प्रसादकाका, विजयकाका, शंतनु, मधुकाका    

 ७ वाजता आम्ही जैतापुर वाडित पोहोचलो तिथे गडावर घेऊन जायला कोणी वाटाड्या मिळतोय का पाहु लागलो. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर मधुकाकांनी एक नाही तर दोन वाटाड्यांची सोय केली होती. सगळे निघाले आणि पुढे जाऊन वाटाड्यांची वाट पाहु लागलो. आश्चर्य म्हणजे आमच्या सोबत येणारे दोन वाटाड्या म्हणजे गावातल्या दोन बायका होत्या. त्या आल्या आणि आम्ही निघालो. सुरवातीला त्या ज्या वेगाने निघाल्या त्या वेगाने आम्ही निघालो खरे पण बाकी मंडळी मागे रहात होती मग तिने जी दूसरी मावशी होती तिला मागे थांबायला लावल आणि मागचे लोक तिच्या सोबत येऊ लागले. रस्ता तर इतका सुरेख होता की वाह क्या बात ! कारण आम्ही ज्या मार्गाने जात होतो तिकडून गेले वर्षभर कोणी गेले नसेल त्यामुळेच मावशी पुढे जाऊन वाट तयार करत असावी कारण थोड़े पुढे जाऊन ती जरा थांबायची मागचे लोक जमेपर्यन्त ती चहुबाजूने नजर फिरवायची आणि मग पुढे जायची .

वाट नसल्या मुळे आमची वाट लागली !!!
 काही वेळाने चालण कमी थांबण जास्त होउ लागला ती वाट अतिशय निसरडी, आजूबाजुला कमरे एवढ गवत , काट्याची झाड़े , कुठे दगड़ा खाली विंचू त्या असल्या वाटेवर कोणी जात असेल का असा वारंवार प्रश्न अशातच दुपारच ऊन चालू झालेल.मधेच एका वेलीने अशक्य हैराण केला. कोलती नावाच्या त्या राक्षस वेलीचा थोडासा स्पर्श ही पुरे मग पुढचे २-३ तास इतकी जळजळ बापरे !!! आणि इथे दोन्ही बाजूला या वेली आणि खाजारया पानाची झाड़े ती वाट म्हणजे "विना चप्पल/कपडे  विस्तवा वरुन घसरगुंडी करण्यासारख होता". सगळी कडून शरीराची नुसती आग आग होत होती. तरी मागच्या लोकांसाठी आम्ही जमेल तेवढ्या त्या वेली कापत चाललो होतो.


दोन्ही बाजूने अधेमधे वेली आणि मधून रस्ता.   
जळजळ करणारी हीच ती कोलती वेल.  

 साधारण ३-४ तासानंतर पाण्याची उणीव भासु लागली. थोड्या वेळाने सगळ्या लोकांकड़चे पाणी संपत आल होत आणि सगळया मनात एकच प्रश्न " आता  पाणी कुठे आहे ". शेवटी एका मंदिरा पर्यन्त सगळे येऊन थांबले आम्ही पोहोचेपर्यन्त मावशीने दिवा अगरबत्ती लावून घेतला आणि एक शिडी दाखवली ती चढून पुढे गेलो की लगेच पाणी अस लोकांना सांगितल्यावर थोड़ा हुरूप आला. मागचे लोक पोचले आणि १० मिनिटातच चला निघुया असा कोणी तरी म्हणाल त्या एका वाक्यावर सुमितचा सात्विक संताप व्यक्त झाला. " ए अरे काये आम्हाला बसून ५ मिनिट पण नाही झाली लगेच निघुया काय.  आधीच पाठीवर ओझे , डोक्यावर ऊन , आजूबाजूला प्यायला पाणी नाही त्यामधे तुम्ही धड़ बसूनही देत नाही."


सावली दिसली की एक पड़ी !

थोड़ा वेळ थांबलो आणि सगळे आले की मग निघालो. गडावर सॅक वैगरे घेऊन जाण्यात काही पॉइंटच नव्हता मग मावशीने एक जागा दाखवली आणि तिथे सगळ्या सॅक ठेवल्या डब्बे, जेमतेम पाणी उरलेल्या आणि  मोकळ्या पाण्याच्या बाटल्या असे सामान घेऊन वर निघालो इथे आमच्याकड़च पाणी जवळ जवळ संपल होता पण या मावशीने गेले ५ तास एक घोटही पाणी प्यायलं  नव्हत. दुपारचा १ वाजला एकदम कड़क ऊन आणि त्यात ती तापलेली लोखंडी शिडी, खाली उभा तप्त खड़क आणि वरुन जाम ऊन लागत होता. आम्ही एक दोघे पुढे आलो मावशी शिडीजवळ सगळ्यांना वर घेण्यासाठी थांबली. आता ग्रुप मधली सगळ्यात लहान ट्रेकर श्रेया खूपच दमली होती तिने तो निसारड़ा रस्ता पाहुन रडायलाच चालू केला. मी येणार नाही तुम्ही पुढे जा असे म्हणत असताना तिला मधु काका बॉबी आणि मिनल असे तिघेही हळूहळू पुढे घेऊन येत होते.



उपासवाली मावशी साहिलला वर घेताना.  



प्रसाद काका. 






















शेवटी मावशीने त्यांना वर घेतला आणि आम्ही पुढे निघालो. काही जण शिडी च्या खालीच थांबले जिथे सॅक होत्या. काहीजण शिडी च्या वर थोड़ा पुढे सावलीत विसावले. वर जायची गडावरचीसुद्धा वाट ही निसरडीच आहे मग लोकांनी परत जायची वाट दूसरी आहे का असेहि पाहून झाले पण काही उपयोग नाही झाला जिथून आलो तिथूनच परत जावे लागणार होते यामुळे अर्ध्या लोकांची परत थोडीशी तंतरली. पाणी आणायच म्हणून मी ,बॉबी ,सोनल ,शंतनु ,साहिल ,ऋग्वेद आणि २ मावश्या असे पुढे आलो. वर पोचलो समोर पाणी दिसत होत पण समस्या अशी होती समोर साक्षात एक दणकट रेडा बसला होता त्या पाण्याची राखण करायला. मावशी इथून ओरडली

  " एय जाSSSsssय  की र बाबा पानी पिउसनी दे आमाला , जाSSSsss रे बाबू का अस करायलैस पानी पिउदै आमाला........ जा रे जाSSSsss बाबा....हर्र हुररर हैक !!!  "....... इथे तो डुरकला ना !.... कचकन उठला जागेवरून आणि आमची सगळ्यांची टरकली. सगळे २ पावल मागे हटले, तो ५ मिनिट उभा राहिला आमच्या कड़े पहात परत मावशी बोलली त्या सोबत आणि तो पुढच्या शिडीला जाऊन बसला तिकडे जायची यायची पायवाट इतकी बारीक होती की एकतर तो रेडा तरी मावला असता किंवा आम्ही तरी आणि अशातच तो रेडा जर धावत आला असता तर पाणी - बीणी विषयच संपला असता सगळा. आम्ही मस्त पाणी प्यायलो ज्या मावशीने पाणी प्यायला नव्हता तिचा पहिला मान ! आम्ही तोंड वैगरे धुतले आणि बसलो वाट पहात पण मागून कोणीच येईना मग म्हणल हे बहुतेक तिकडेच आपली पाणी घेऊन येण्याची वाट पहात बसले असावेत आमच्या सोबत २-३ डब्बे होते मग विषय झाला की आता हे डब्बे का परत घेऊन जायचे हे खाऊ पाणी पिऊ आणि मग जाऊया असे ठरले आणि आणलेले डब्बे फस्त केले , मग त्यातला एक डब्बा मस्त होता डाळ कांदा भाजी आणि पोळी वाह वाह  कोणाचा आहे हा डब्बा असे विचारले तर आमच्या पैकी कोणाचाच तो नव्हता असे कळले आता तो बंद करावा म्हणल तर करूनही काही फायदा नव्हता कारण तो संपत आला होता. डब्ब्याचा मालक कोण याची कसलीही चौकशी न करता आम्ही तो संपवला होता... सोबत आलाय म्हणजे इथल्याच कोणाचा असेल असा समज झाला, या सगळ्यामधे कळाल की ज्या मावशीने पाणीही प्यायला नव्हता तिचा उपास आहे, बापरे ! अवघड आहे हे !! मग नशिबाने सोनल का आणखी कोणी राजगिरा लाडू घेऊन आले होते. त्यातलेच २ लाडू मावशीलाही दिले. तिने काहीच खाल्ले नसते तर आम्हाला फार वाइट वाटला असत.
पुढे निघालो बालेकिल्ल्यावर जायला पण समस्या अशी होती की रेडोबा आता पुढच्या शिडी च्या खाली बसले होते. तिथे त्याच्या बाजूने जायच अस जरी म्हणलं तरी त्याची एक ढुशी आम्हाला खुप महागात पडली असती. मावशीने अतोनात प्रयन्त केले त्याला हुसकावन्याचे पण तो काही तसूभरही जागचा हलेना. उपासवाल्या  मावशीचे रेड्यासोबतचे संवाद म्हणजे अगदीच भारी होते.
" अय अार बाबा जाऊ दी की र आमाला वर का अस वाट अडवून खुळयावानी करायलैस " " उठ रे उठ बाबाsss उठ !!  जा की पल्याड कवडी जागा हाय तिकड हीकड काय गठुड बांधून बसलायैस" अस बरच काही चालू होता. शेवटी ती वैतागली आणि म्हणाली  " व्हतुस तिकड का घालु दगुड़ आता" असा म्हणून तिने दगड उचलायला वाकली आणि तेवढ्यात  दूसरी मावशी म्हणाली  "आयss  ईल की हिकड त्ये !!  जायला बी वाट न्हाय हिकड चल जाऊ म्हागारी , नाय तर तू बस मी चालले "  तो रेडा हु की चु करत नव्हता फ़क्त आमच्या कड़े खुन्शी नजरेने पाहत होता.
वाटेत थांबलेला रेडोबा 
मग आम्ही सगळे मागे निराशेने वळालो. पाण्याजवळ आलो बाटली भरलेलीच होती  आता उशीर होतोय म्हणून निघालो,पुढे गेलो तेवढ्यात हृषिकेश चा आवाज आला " अरे कुठे आहात तुम्ही, आहे का कोणी इकडे .......??"
मी आणखी थोड़ा पुढे गेलो, सगळी मंडळी पाण्याच्या शोधार्थ पुढे आली होती. त्यांना इकडे आहोत असे कळवल , त्यांनी बराच वेळ आम्हाला आवाज दिला पण आमच्या पर्यंत तो पोहोचतच नव्हता. त्यामुळे तेच लोक सगळे हळूहळू पुढे आले. थोड्याच वेळाने सगळ्यांचे डब्बे उघडले आम्ही अर्धी पोटं आधीच भरल्यामुळे जास्त काही खाल्ला नाही. आता चिंता एकच होती आम्ही डब्बा ज्या कोणाचा खाल्ला ज्या वेळी त्यांना कळेल की आपला डब्बा आधीच कोणी खाल्ला आहे तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल ? मग हळूहळू सगळे आपआपला डब्बा काढू लागले , तेवढ्यात कानावर आला " अरे ती लाल पिशवी कुठे आहे त्या मधे एक पाणी बाटली आणि एक डब्बा होता." 
तो आवाज आला रे आला की आम्ही एकमेकांकडे पहिला , झालं आता सांगायच कस ? की पंडितकाका तुमचा डब्बा आता भरलेला नाहीये ! तो केव्हाच मोकळा झालाय.थोड़ा वेळ शोधशोध झाली. मग मीच हळूच म्हणालो " अरर काका तो तुमचा होता का डब्बा ? प्रत्यक्षात आम्ही तो खाल्ला आहो, ती सोनलच म्हणाली खाऊया म्हणून चांगली झालीये भाजी, चव लागलीये आता , आम्ही म्हणत होतो की सोनल आपण नको खायला पण तीनेच संपवला अर्धा !! मग अर्धा ठेवुन काय करायच म्हणून पूर्णच संपवला." काका काही बोलायच्या आत "काका सॉरी हा !!  असा म्हणून आम्ही सोनल वर बिल फाड़ल !! काका म्हणाले "अरे हरकत नाही तुम्ही खाल्ला ना झाल तर नो टेंशन " असा म्हणल रे म्हणल एकदम डोक हलक झाल आणि बाहेर आलेले बाकीचे डब्बे खाण्यासाठी आम्ही एकंदरीत मोकळे झालो.
दूसरीवाली  मावशी
       डब्बे खाल्ले, पोटं भरली आता सगळे सुस्तावले होते. तेवढ्यात कोणी तरी म्हणाल "अरे तो रेडा उभा रहिलाय येईल आता धावत इकडे !!" आता वाद घालण्यात विषयच नव्हता पुढच्या १०व्या मिनिटाला सगळा आवरुन सगळे निघालेही. थोड्या दुरून मागे पहिला तर तो रेडा उभा राहून टक लावून आमच्याकडेच पाहात होता. त्या रेड्या मुळे दुसऱ्या शिडी जवळही जाता आल नाही मग गडावर जायचा दूरच. सगळ्यांनी रिकाम्या बाटल्या भरल्या होत्याच त्या मुळे पाणी हा विषय पुढच्या तीन-एक तासा साठी सुटला होता. दुपारचे २-२.३० वाजले होते गडाच्या खडकाळ माथ्यावर असल्याने सावलीची जास्त सोय नव्हती. आता पुन्हा तीच निसरड़ी वाट , तीच अग्निपरीक्षा द्यायची असल्याने अंगावर काटा आला, आता पुन्हा ६ तास उतरत जायच होत. श्रेया ला मधे घेतला अर्धे पुढे अर्धे मागे असे हळूहळू उतरू लागलो उतरताना तीच धसमुसत मुसुमुसु पाणी वाहातच होता. मधु काका मिनल आणि बॉबी तीघांसोबत श्रेया आपल उतरत होती. शिडिच्या खाली जी लोका थांबली होती त्यांना पाणी दिल तिकडे एक थांबा झाला. कोकणे काकांचा गुडघा दुःखत होता तर मग त्यांची मी सॅक घेतली येताना काही वेळ हृषिकेश आणि मंडळी कड़े फिरून ती उतरताना माझ्या कड़े पोस्त झाली. थोडेच पुढे मीना आत्याचीही सॅक माझ्याकडे घेतली. आता सगळ्यात पुढे आम्ही निघालो उपासवाली मावशी आणि आम्ही लोका बाकी दूसरी मावशी काही वेळ थांबली मागच्या लोकांसोबत पण काही वेळा नंतर ती वैतागली
किती हळूहळू चालत आहेत म्हणून आणि तीही एकदम पुढे निघून आली " काय बै ती म्हातारी लोका !  लै टेम घेताय ते ! म्या आलै मंग फुडा " अधे मधे जायची मागे पण पुन्हा पुढे यायची अस तीच येये जाजा चालू होता. साधारण ३-४ तासानी ६.३० - ७ वाजता वैगरे पुन्हा सगळ्यांच पाणी संपला आणि अधे मधे पाणी कुठेच नव्हता अंधार पडत होता सगळ्यांकडे टोर्च होते त्यामुळे अंधाराची भिति अशी नव्हती. आमच्या सोबत ज्या मावश्या होत्या त्या सकाळी सकाळी आमच्या सोबत निघालेल्या जर आम्ही नसतो तर त्या दुपारी १२-१ वाजेपर्यंतच गावात परत आल्या असत्या पण आम्ही ज्या गतीने चाललो होतो  त्या गतीने त्याना खूपच उशीर होत होता. जाता मावशी म्हणे  " अय बाबू तुजी पाठ दुखन कि कायला यवढी तीन-तीन वझी घेतलस रं !!!! दे माझ्याकड येक दे  ! " मी म्हणालो "थांबणारच आहे आता पुढे राहुदया मावशी चला बिगीबिगी" .... ....... आम्ही एका जागेवर येऊन थांबलो सूर्यास्त होत होता. 






मागच्या लोकांना खूपच वेळ लागत होता. अंधार पड़ला मग मंडळी येई पर्यन्त उपासवाल्या मावशी सोबत गप्पा मारत बसलो वस्तुतः ती जाम वैतागली होती घरी जेवायला कोण करेल, खुप उशीर झालाय तिचा नवरा तिला ओरडेल, वगैरे वगैरे.  मावशी म्हणजे एकदम शाकाहारी होती, कपाळावर मोठ्ठ कुंकु, केसाची एक बट पांढरी झालेली, पायात तुटलेली स्लीपर आणि तरीही सगळ्यांच्या पुढे ,दोन्ही हातात हिरव्या बांगड्या,गळ्यात तुळशी माळ आणि मंगळसूत्र, स्वच्छ नेसलेली पांढरी साड़ी आणि काहीही झाल तरी गोड़ बोलणारी, माझ नाव तिला कदाचीत माहित नसेल पण बाबू म्हणून बोलावणारी मला ती जाम आवडली होती. त्यांच्या जेवणाच्या मेनु मधला खासंमखास मेनू म्हणजे पनीर ! आणि पनीर आणण्यासाठी तिला २१ किलोमीटर दूर खेड़ला जायला लागत. खेड़ जायची सोय म्हणजे बेभरवशी एस टी महामंडळ जी मनाप्रमाणे कधीही केव्हाही कुठलीही वेळ चुकवू शकते नाहीतर आपली ११ नंबर ची बस (चालत). अश्याच काही गप्पा चालू असताना अर्धी मंडळी आली. मागे असलेल्या लोकांचा आवाजही येत नव्हता खुपच मागे राहिलेले ते. दूसरी मावशी म्हणे "चल बै ! जाऊ अपन फ़ूडा कूटट रातच्या बारीला थांबायैच यतील मागची मागून " " तुला मी सांगतय ती सगळी मांग झोपली आसतीन बग "  मग उपासवाली मावशी म्हणे "हं लै शानीयस त्यास्नि सोडून जायाच मंग हरवले बिरवले तर येशील का वापस शोधाया त्यासनी" ! " अय बाबू जा रे कुठ हायत जरा बगुन यं आवाज दे बग त्यांना " मी उठलो थोड़ा पुढे जाऊन सुम्याला आवाज दिला तिकडून ही आवाज आला पण ते लोका बरेच मागे होते. सगळ्यांच पाणी संपलेला होता त्यामुळे सगळे निवांत पडले होते. मी मावशीला म्हणालो "मावशी आपण घरी पोचलो आणि समज तुझ्या नवऱ्याने आपल्याला पनीरची भाजी आणि भाकरी केली असेल तर कसली मज्जा येईल ना ! " मावशी खो खो हसायला लागली  " हा हा हा हा ।  . . . . . . . . .  माज्या नवऱ्याने व्हय ? त्येनला सादी दाल बी करता येत न्हाई !  कसबस चा कर्तेत आन पेतात अता गेल्यासनी ईचार त्येनला !!! एवढ्या उशिरा आपल्या समदयांला घरी घेतला तरी लै जालं ! "


उपासवाली मावशी नवऱ्या सोबत !
 २०-२५ मिनिटाने वरची मंडळी पाणी कुठे, पाणी कुठे करत खाली आली. विहिर अजुन दूर आहे आणि विहिरी मधून पाणी काढायला बादली वगैरे काही नाही आहे त्यामुळे पाणी एकदम गावातच मिळणार आहे, हे ऐकून आणखी मंडळी हिरमुसली जरा वेळ सगळ्यांनी आराम केला आणि लगेच उशीर होतोय म्हणून सगळे निघाले. " आता कुनीबी माग रावु नका सगळे येकामागयक या लौकर !" आणि मावशी माझा टोर्च घेऊन पुढे निघाली तिच्या मागे मी आणि मागोमाग सगळी मंडळी पटापट निघाली.

अंधारातला रस्ता. 
रस्ता तर कळतच नव्हता घसरत  तिथुन विहिर तशी खुप दूर नव्हती पण सगळे दमले असल्याने ती खूपच दूर वाटत होती. अर्ध्या तासाने विहिर आली त्या पुढेच एक झरा लागला तिथे लोकांनी मनसोक्त पाणी प्यायल. थोड्याच वेळात पुढे गाव लागल रात्रीची वेळ असल्याने गावात नीरव शांतता पसरली होती. कोणीही मोठ्याने बोलू नका असे आपापसात खुसपुसत सगळे चालत होते. उपासवाल्या मावशीच्या घरी एकदाचे पोहोचलो गेल्या गेल्या तिने कळशीभर पाणी ठेवला सगळे परत पाणी प्यायले तृप्त झाले आणि पहुडले. काहीवेळातच तिने गरम पाणी हात पाय धुवायला आमचा अगदी राजेशाही थाट चालला होता. थोड्याच वेळात तिने जो चहा केला तो म्हणजे अगदी अप्रतिम होता. सरतेशेवटी तिने पिठला भात बनवला तोहि अतिशय भन्नाट झाला होता. सगळ्यात विशेष म्हणजे तिचा दिवसभर उपास होता, तीने आमच्या मधल्या प्रत्येकाला तीन तास विनापाण्याच उन्हात थांबून गडावरच्या त्या निसरड्या वाटेवरच्या शिडीपुढे पाण्याच्या टाक्या पाशी पोहोचवून खाली आणल होता. त्यावर हे सगळ झेलून घरी आल्यानंतर सगळ्यांसाठी चहा-स्वयंपाक बनवला होता.
           दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ४ जण पुढे निघणार होतो बाकी मंडळी उशिराच्या गाडीने परतणार होती, सकाळी चहा- नाश्ता झाला



उपासवाल्या मावशीच्या घरी.
त्याआधी थोड़ा वेळ मधुकाका आणि साहिल, सुमित यांचे गायन ऐकायला मिळाले. ऋग्वेद चे पखवाजवादन झाले. मीही आपली थोडाशी बासरी वाजवली. चौकशी केल्यावर कळल दुपारी १.३० ची एस टी आहे खेड साठीची मग तो पर्यन्त पत्ते खेळलो निघताना मावशीची भेट काही झाली नाही ती सकळीच कुठे तरी बाहेर गेली होती. तिची भेट नाही म्हणून थोड़ी रुखरुख रहिलीच मनात बरोब्बर १.३० वाजता आम्ही गावातल्या एस टी स्टॅंड जवळ पोचलो. १५ मिनिट थांबल्या नंतर कळल येणारी एस टी रद्द झाली आहे. मग आता आम्ही जाण्यासाठी दूसरे वाहन शोधू लागलो. मालवाहु वाहन मिळाले पैसे ठरवले आणि आम्ही निघालो २०-२५ मिनिटाने अचानक ते वाहन थांबले चालक कोणासोबत तरी गप्पा मारायसाठी थांबला होता.एवढ्या उन्हात हा कोणाशी गप्पा मारायला थांबला असा विचार मनात, आवाज थोड़ा ओळखीचा वाटला, सर्रररर करुन एकच विचार, एकच व्यक्ति डोळ्यासमोर आली" मावशी " आणि मी मोठ्यांदा आवाज दिला " अय मावशी आर हिगड़ कुट्ट " ! !!! ती पण एकदम आश्चर्यचकित झाली "  रे बाबू निघालस कै तू पुन्याला "


बॉबी,सोनल,मावशी आणि मी. 

५ मिनट गप्पा मग  मारल्या जाता जाता म्हणे "आता माशिवरात्रि ला ये हिकड लै मज्जा अस्तेय बग त्यो
  तुजा मोबाइल नंबर टाक या मोबाईलमंदी " मी तिला माझा नंबर सेव्ह करुन दिला पण तिचा नंबर घ्यायचा राहिला काल परवा झालेल्या महाशिवरात्रीला तिची आठवण आली म्हणल गडावर नक्कीच मज्जा झाली असेल पण ती आणखी काही दुसऱ्या ट्रेकर मंडळींची. आम्ही सगळेच खुश झालो चला जाताना तरी मावशी भेटलीच . दुपारी २.३० वाजता आम्हाला पूण्याची गाड़ी मिळाली. आणि रात्री १०-११ च्या दरम्यान आम्ही पुण्यात पोहोचलो. मावशी भेटली नसती तर कदाचीत ट्रेक अधूरा वाटला असता पण ती भेटली आणि ट्रेक पूर्ण झाला.  





सहभागी सदस्य 

  1. मधुकर संत.
  2. प्रसाद ठकार.
  3. मुकुंदा संत. 
  4. दिलीप चौधरी. 
  5. हृषिकेश चौधरी.
  6. शांतनु ठकार.
  7. अनुराधा नार्वेलकर. 
  8. सुमित संत. 
  9. सोनल शर्मा. 
  10. ऋग्वेद देशमुख. 
  11. विजय कोकणे. 
  12. दिनेश अाड़कर.
  13. मनोहर पंडित. 
  14. मिनल अडरकट्टी.
  15. साहिल अडरकट्टी. 
  16. श्रेया अडरकट्टी.
  17. निखिल चौधरी.